29 Oct 2026, Thu

आयुक्तांना आलेला ‘तो’ आक्षेपार्ह मेसेज खोटा? निलंबित अधिकाऱ्याच्या बचावासाठी स्थायी समिती मैदानात?

पथ विभागातून पाणीपुरवठ्यात बदली रोखण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांना पाठवला होता मध्यरात्री आक्षेपार्ह मेसेज.

Pune बदली रोखण्यासाठी थेट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना आर्थिक देवाण-घेवाणीचा उल्लेख असलेला आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याप्रकरणी निलंबित केलेल्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी स्थायी समिती सरसावल्याची चर्चा आहे. या आक्षेपार्ह मेसेजच्या चौकशीसाठी आयुक्तांनी पोलिसांत तक्रार करावी, अशी सूचना समिती सदस्यांनी केली. त्यामुळे या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी स्थायी समिती का पुढे आली, असा सवाल उपस्थित होत आहे.पथ विभागातील अधीक्षक अभियंता अशित जाधव असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्यांची दीड महिन्यापूर्वी पथ विभागातून पाणीपुरवठा विभागात बदली झाली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता. ही बदली रद्द करण्यासाठी विविध माध्यमांतून आयुक्तांवर दबाव आणल्याची चर्चा होती. असे असतानाच काही दिवसांपूर्वी जाधव यांनी एका त्रयस्थ व्यक्तीचा संदर्भ देत बदली रद्द करण्यासाठी आर्थिक व्यवहाराचा उल्लेख असलेला आक्षेपार्ह मेसेज रात्री उशिरा आयुक्तांना पाठविल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी केलेल्या चौकशीदरम्यान संबंधित अधिकाऱ्याने हा मेसेज आणखी दोन अधिकाऱ्यांनाही पाठविल्याचे समोर आले. मोबाइलची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाने जाधव यांना तात्काळ सेवेतून निलंबित केले. या कारवाईचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर हा प्रकार राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.

स्थायी समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
स्थायी समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी या प्रकरणावरून महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली. समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले, की समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी संबंधित मेसेज खोटा असल्याचा दावा केला. हा मेसेज केवळ दोन अधिकाऱ्यांच्या मोबाइलमध्ये असताना तो बाहेर कसा आला आणि संबंधित अधिकाऱ्यानेच तो पाठविला का,याची सखोल चौकशी होण्यासाठी आयुक्तांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी समितीची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्थायी समितीला संबंधित अधिकाऱ्याबाबत एवढा कळवळा का, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या अधिकाऱ्याने स्वतःला वाचविण्यासाठी समिती सदस्यांशीही संपर्क साधला होता का, अशीही चर्चा महापालिकेत रंगली आहे.

एक जण ताब्यात
महापालिकेत बदल्या, तसेच कामे करून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीस महापालिकेच्या सुरक्षा विभागाने गुरुवारी संध्याकाळी महापालिकेत ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून, रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button