29 Oct 2026, Thu

गरवारे’तील वाचन कक्षाचे शनिवारी ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ नामकरण


पुणे : सुप्रसिद्ध साहित्यिक व मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील माजी प्राध्यापक, प्रा. द. मा. मिरासदार यांची जन्मशताब्दी तसेच गरवारे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय वाचन कक्षाचे ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ नामकरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे (स्वायत्त) कार्यक्रम शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता स्वा. सावरकर सभागृह, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) येथे आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) असणार आहेत. भाजपाचे सरचिटणीस, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, मएसो नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्राचार्य किशोर देसर्डा यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
प्रा. द. मा. मिरासदार यांनी १९६९ ते १९८७ या कालावधीत गरवारे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून योगदान दिले. ग्रामीण विनोदी शैलीतील कथालेखन, कथाकथन या कलाप्रकाराद्वारे त्यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. १९९८ मध्ये झालेल्या ७१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाविद्यालयाशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधामुळे मिरासदार यांचे नाव ग्रंथदालनास देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button