
पुणे : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांच्या टीमने एका चार वर्षांच्या मुलीच्या पोटातून गिळलेले चुंबकीय ब्रेसलेट काढण्यात यश मिळवले.या ब्रेसलेटने पोटात व आतडीमध्ये छिद्रे निर्माण केली होती.या ब्रेसलेटला लॅपॅरोटोमी या खुल्या प्रक्रियेच्या माध्यमातून काढण्यात आले.या मुलीची प्रकृती आता चांगली आहे.
सतत खोकला येत असल्याने या मुलीला तिचे आई-वडील खराडी येथील क्लिनिकमध्ये घेऊन गेले.तिथे इतर प्रतिक्षा करत असलेल्या रूग्णांबरोबर ते एक्स-रे घेऊन बसले होते.त्यावेळेस शेजारच्या रूग्णाने त्यांना डॉ.प्रमोद कटारे यांचे नाव सांगितले आणि तेथून ते कटारे यांच्या क्लिनिकमध्ये गेले.
नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील गॅस्ट्रोइंटेरोलॉजिस्ट,हेपॅटोलॉजिस्ट आणि जीआय एंडोस्कोपिस्ट (पोटविकार,यकृत विकार आणि जठर रोग तज्ञ) डॉ.प्रमोद कटारे म्हणाले की ,तिच्या पोटात कुठली तरी बाहेरची वस्तू गेल्याचे एक्स-रे मध्ये दिसत होते.ही वस्तू त्या मुलीने गिळली होती हे पालकांना माहित नव्हते.परिस्थितीचे गांभीर्य बघता मी त्यांना लगेचच नोबल हॉस्पिटल मध्ये येण्याचा सल्ला दिला.
अशा परिस्थितीत बाहेरील वस्तू काढण्यासाठी सहसा एंडोस्कोपीचा वापर केला जातो.मात्र एंडोस्कोपी करताना आत गेलेली वस्तू ही ब्रेसलेट आहे,हे लक्षात आले.या गोल चुंबकीय ब्रेसलेटच्या बाजू एकमेकाला तशाच जोडलेल्या स्थितीत होत्या.त्यातील एक भाग पोटात होता आणि दुसरा भाग छिद्र करत छोट्या आतड्यातून पोटाच्या बाहेर आला होता.या अशा स्थितीमुळे एंडोस्कोपीच्या माध्यमातून ही वस्तू बाहेर काढणे शक्य नव्हते.त्याशिवाय हे ब्रेसलेट एका महत्त्वाच्या रक्तवाहिन्याच्या मागेपर्यंत पोहचले होते आणि छोट्या आतड्याच्या दोन भागांमध्ये याने छिद्र पाडले होते.याशिवाय पहिले छिद्र हे जठाराजवळ होते. उपचारात कुठलीही दिरंगाई ही जोखीम कारक होती. त्यामुळे खुली शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
यानंतर सीटी स्कॅन करण्यात आले,ज्यामधून ब्रेसलेटची गुंतागुंत आणि एकंदर परिस्थितीचे स्पष्ट चित्र दिसून आले. नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील बालरोग व नवजात शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.प्रणव जाधव म्हणाले की,ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आम्ही लॅपॅरोटोमी प्रक्रिया केली.या प्रक्रियेमध्ये ओटीपोटाच्या भिंतीला छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जाते.अनेक चुंबक असलेल्या या ब्रेसलेटमुळे पोटात आणि आतड्यात छिद्र निर्माण केले होते. याचबरोबर छिद्र पडल्यामुळे मलस्वरूपातील अन्न छिद्रातून बाहेर येऊन शरीरात पसरले असते तर त्या मुलीच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये आम्ही ब्रेसलेट बाहेर काढले व छिद्र पडलेल्या तीन ठिकाणी जखमा साफ करून तिथे टाके बसविले.
ही शस्त्रक्रिया 29 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली.त्यानंतर देखरेखीकरिता या मुलीला दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आणि एका आठवड्यात डिस्चार्ज देण्यात आला.पाठपुरावा करण्यासाठी 15 जानेवारी 2026 ला त्या मुलीचे आई-वडील तिला आमच्या क्लिनिकमध्ये घेऊन आले होते,असे डॉ.जाधव यांनी सांगितले.आता या मुलीची प्रकृती चांगली असून सामान्यपणे खाऊ-पिऊ शकते.
डॉ.प्रमोद कटारे आणि डॉ.प्रणव जाधव या दोघांच्या मते लहान मुले 6 वर्षांची होऊपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.याचे कारण कुठलीही वस्तू तोंडात घालण्याची सवय लहान मुलांना असते.काही वेळेला या वस्तू गिळल्या जातात. चुंबकीय ब्रेसलेटस,नाणी व इतर छोट्या या हानिकारक ठरू शकतात आणि म्हणूनच लहान मुलांपासून या दूर ठेवाव्यात.
