3 Mar 2026, Tue

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटकर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात

पुणे : शाळेच्या आठवणींनी ओथंबलेले क्षण, मैत्रीचा जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या अंगणात पाऊल ठेवत आनंद मेळ्याचे आयोजन केले. शिक्षणाचा वारसा पुढे नेत माजी विद्यार्थ्यांनी आजी विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याकरिता दिंडी काढली. यासोबतच शाळेच्या विकासासाठी १ लाख रुपयांची देणगी देत संस्थेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी शिक्षण परिषदेच्या पर्वती येथील शाळेत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमिला ताई गायकवाड, अजय आबा पाटील, मुख्याध्यापक माने सर व माजी मुख्याध्यापक संजय भैलुमे सर यांनी मार्गदर्शन केले. तसेच बहुजन मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि उत्तमराव पाटील यांना रांगोळीच्या माध्यमातून चलचित्र साकारून अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम हिरे हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला.

शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्गातील तासांत शिक्षकांशी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मधल्या सुट्टीनंतर मैदानावर कबड्डी, खो-खो, लंगडी अशा खेळांनी वातावरणात उत्साहाची भर पडली आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्णकाळाचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. शिक्षणाबद्दलची निष्ठा, शिक्षकांविषयी आदर आणि समाजाप्रती बांधिलकी यांचे सुंदर दर्शन या आनंद मेळ्यातून घडले.

फोटो ओळ : शाळेच्या आठवणींनी ओथंबलेले क्षण, मैत्रीचा जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेच्या अंगणात पाऊल ठेवत आनंद मेळ्याचे आयोजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button