3 Mar 2026, Tue

अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर यांच्या तीन पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन

प्रशासकीय अधिकाऱ्यांना समाजजीवनाचं खरं दर्शन घडतं – मिलिंद जोशी

पुणे – प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अनुभवांचं भांडार असतं. समाजजीवनाचं जवळून खरं दर्शन त्यांनाच घडतं. आपले अनुभव त्यांनी शब्दांकित करायला हवेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले.

राजीव नंदकर यांनी संपादित केलेल्या आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या ‘गावविकासातून राष्ट्रविकास’, के सागर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘स्पर्धा परीक्षा प्लॅनर’ आणि मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘जगायचं कसं’ तसेच शेखर गायकवाड सर यांनी लिहिलेल्या ‘सरकारी ऋतुचक्र’ आणि अनुराध्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व आराध्या नंदकर हिने लिहिलेल्या ‘सारा पार्कर अँड द विच रिव्हेंज’ अशा पाच पुस्तकांचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, जोशी, बालसाहित्यिका डॉ संगिता बर्वे, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, यशदाच्या प्रकाशन विभागाच्या डॉ. किरण धांडे, के सागर प्रकाशनाचे श्रीकांत क्षीरसागर, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, आराध्या प्रकाशनाच्या चेतना नंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नंदकर यांनी प्रस्तावना केली. ते म्हणाले, ‘‘प्रशासकीय अधिकारी कितीही व्यस्त असला तरीही त्याने आपले प्रशासकीय अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी वेळ द्यायला हवा. अधिकाऱ्यांनी लिहायला हवे.’’ त्यानंतर पाचही पुस्तकांच्या प्रकाशकांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली.

यावेळी बोलताना डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘‘छोटी आराध्या नव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करत आहे. ती केवळ लिहित नाही, तर ती वाचन संस्कृती अधिक बळकट करत आहे.’’
गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले, ‘‘प्रशासनात काम करत असताना दररोज अनेक गमतीजमती घडत असतात. त्याकडे विनोदबुद्धीने बघत आनंदाने जनसेवेचे कार्य पार पाडणे आवश्यक आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने गंभीर न राहता नेहमी प्रसन्न रहायला हवे.’’

यावेळी बोलताना सासणे म्हणाले, ‘‘शासकीय अधिकारी लिहित आहेत ही गोष्ट सकारात्मक आहे. या माध्यमातून शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होत आहे.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेस्विनी थोरवे यांनी केले. तर चेतना नंदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील महाजन, व्यंकटेश कल्याणकर, सार्थक थोरवत यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button