आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेता हर्षवीर सिंगची चमक; भारतीय आव्हानाचे नेतृत्व

पुणे : भारताची पहिली कॉन्टिनेंटल बहुस्तरीय सायकल शर्यत ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ सोमवारी दुपारी डेक्कन जिमखाना जवळील गुडलक चौक येथून उत्साहात सुरू झाली. या पाच दिवसीय स्पर्धेचा अधिकृत शुभारंभ ‘प्रोलॉग’ टप्प्याने झाला. यामुळे भारतीय सायकलिंग क्षेत्रातील या ऐतिहासिक आठवड्याचा स्पर्धात्मक पाया रचला.
पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, क्रीडा आयुक्त शीतल उगले – तेली, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते सायकलपटूंना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. दुपारी ठीक दीड वाजता, भारतीय राष्ट्रीय विकास संघाचा सचिन देसाई हा शर्यतीला सुरुवात करणारा पहिला सायकलपटू ठरला. यावेळी जमलेल्या प्रेक्षकांनी ‘सचिन, सचिन’ अशा घोषणा देऊन त्याचे मनोबल उंचावले. यात १६४ सायकलपटू प्रत्येकी एक मिनिटाच्या अंतराने वैयक्तिकरित्या सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील ७८, युरोपमधील ६९, तर ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडांतील सायकलपटू सहभाग घेत आहेत. भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघही या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला असून, देशांतर्गत सायकलिंगसाठी ही स्पर्धा मैलाचा दगड ठरणार आहे.
पहिल्या दिवसाच्या अखेरीस मलेशियाच्या ‘तेरेंगानू सायकलिंग टीम’च्या फर्ग्युस ब्राउनिंग (ऑस्ट्रेलिया) याने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने अवघ्या ८ मिनिटे ०५.८९ सेकंदांत ७.५ किलोमीटर अंतर कापून अव्वल स्थान पटकावले. ताशी ५० किलोमीटरपेक्षा जास्त सरासरी वेगाने सायकल चालवत ब्राउनिंगने सर्वांत वेगवान वेळ नोंदवली आणि मानाची ‘यलो जर्सी’ पटकावली. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात तो या जर्सीत दिसेल. विजयानंतर ब्राउनिंग म्हणाला, ‘मी सुरुवातीपासूनच खूप जोर लावला होता. शेवटचा टप्पा उताराचा असल्याने फक्त वेग टिकवून ठेवण्याचे आव्हान होते. अशा प्रकारची स्पर्धा भारतात पहिल्यांदाच होत असल्याने मला नेमकी काय अपेक्षा करावी हे माहित नव्हते; पण आयोजकांनी रस्ते अप्रतिम ठेवले आहेत आणि सुरक्षा व्यवस्थाही उत्तम आहे. मी पुढच्या डोंगरदऱ्यांच्या टप्प्यांसाठी उत्सुक आहे.’
दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचाच डिलन हॉपकिन्स (रूजाई इन्शुरन्स विनस्पेस, थायलंड) राहिला. त्याने ८ मिनिटे ०६.३३ सेकंद वेळ नोंदवली.सायप्रसच्या क्विक प्रो टीमच्या अँड्रियास मिल्टियाडिसने ८:०८:९२ वेळेसह तिसरे स्थान पटकावले, त्यानंतर बेल्जियमच्या टार्टलेटो-आयसोरेक्स टीमचा योरबेन लॉरिसन (८:११:४९) चौथ्या क्रमांकावर राहिला., तर झेब कायफिन पाचव्या स्थानावर राहिला.
भारतीय खेळाडूंमध्ये राष्ट्रीय संघाचा हर्षवीरसिंग सेखोन सर्वांत वेगवान ठरला. त्याने ८ मिनिटे ४२.०७ सेकंद वेळेसह आशियाई खेळाडूंमध्ये तिसरा क्रमांक आणि एकूण क्रमवारीत २६ वे स्थान मिळवले. विश्वजित सिंग (३५ वे स्थान) आणि नवीन जॉन (४३ वे स्थान) यांनीही समाधानकारक कामगिरी करत आपली छाप पाडली. जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत घरच्या मैदानावर स्पर्धा करण्याची ही भारतीय खेळाडूंसाठी मोठी संधी होती.
ही स्पर्धा ‘युनियन सायकलिंग इंटरनॅशनल’ (यूसीआय) २.२ श्रेणीत मोडत असल्याने याला जागतिक महत्त्व आहे. येथील कामगिरीमुळे खेळाडूंना लॉस एंजेलिस ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वाचे रँकिंग गुण मिळणार आहेत.
आज ९१.८ किलोमीटरचा टप्पा
शर्यतीच्या पहिल्या टप्प्याला आज, दुपारी दीड वाजता हिंजवडीच्या टी. सी. एस. सर्कलपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर आहे. त्यानंतर माण–अंबवडे गाव कमान–पौड–चाले–नांदगाव–कोळवण–हडशी लेक–जावण–तिकोना पेठ–काले–कडधे–थुगाव–शिवणे–डोणे–सावळे चौक–आढळे बुद्रुक–बेबडओहळ–चंदनवाडी–चांदखेड–कासारसाई–नेरे–मारुंजी–लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे, डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथून शर्यत जाईल. आकुर्डी येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास या टप्प्याचा समारोप होणार आहे.
प्रत्यक्ष शर्यतीला सुरुवात होण्याआधी नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील मुख्य चौकात पारंपरिक पोशाखात भगवे फेटे परिधान करून ढोल-ताशा पथकाने सर्वांचे स्वागत केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या गगनभेदी घोषणांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा संचारली. काही परदेशी प्रेक्षकही या वेळी उपस्थित होते. यानंतर स्वयंसेवकांमधील काहींनी नृत्य सादर केले. मात्र, हा सोहळा मुख्य चौकात होता. तेथे सामान्य प्रेक्षकांना पोहोचताच येत नव्हते. बॅरिकेट्स लावल्यामुळे प्रेक्षकांना लांबूनच उद्घाटन सोहळ्यात काय सुरू आहे, याचा अंदाज लावावा लागत होता.
सुरक्षेच्या दृष्टीने स्पर्धा मार्गावर सुमारे एक हजार ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यामध्ये स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा, विशेष शाखा, बॉम्ब नाशक पथक; तसेच शीघ्र कृती दलाचा समावेश होता. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि तांत्रिक साह्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती.
