बीएनसीए आणि पीव्हीपी महाविद्यालयाच्या 18 विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग

पुणे : गेली सत्तर वर्षे विविध स्थित्यंतरांमधून गेलेला डेक्कन जिमखान्यावरील जंगली महाराज रस्त्याचे सामाजिक व सांस्कृतिक पैलू अभ्यासण्यासाठी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) आणि पिरंगूट येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील (पीव्हीपी) कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या मिळून 18 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. भूशास्त्रकला (लॅण्डस्केप आर्किटेक्चर) आणि शहर रचना (अर्बन डिझाईन) या दोन शास्त्रांंमधील मिळून नऊ सिद्धान्तांचा समन्वय या रस्त्यावरील नियोजनात झाला असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला असून त्यावर 10 मिनिटांच्या तीन दृकश्राव्य चित्रफिती त्यांनी नुकत्याच तयार केल्या.
बीएनसीएचे प्राचार्य डॉ.अनुराग कश्यप यांच्या पुढाकारातून व पीव्हीपीचे प्राचार्य आर्किटेक्ट प्रसन्न देसाई यांच्या सहकारातून ही कार्यशाळा संस्थेतील भूदृश्यकला अर्किटेक्चर विभाग प्रमुख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांच्या कल्पनेतून साकारली. त्यासाठी याच विभागातल्या प्रा. मुक्ता गोखले-कुलकर्णी तसेच पीव्हीपी महाविद्यालयातील, प्रा. शेखर गरूड, प्रा.अनुजा चावडा आणि प्रा. मधुरा रायरीकर यांनी ती प्रत्यक्षात एका कार्यशाळेच्या माध्यमातून आणली. त्यातून झालेल्या अभ्यासात जंगली महाराज रोड हा केवळ वाहतूक मार्ग न राहता तो पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा, आठवणींचा आणि सामाजिक व्यवहारांचा अविभाज्य भाग कसा आहे, हे त्यातून स्पष्ट झाले.
विद्यार्थ्यांनी विविध सिद्धान्तांच्या आधारे या रस्त्याशी जोडलेल्या दृश्य (मोजता येतील अशा) घटकांच्या अभ्यासात या रस्त्याची रचना, दुकाने, पादचारी-वर्तन यांचा अंतर्भाव केला. तसेच अदृश्य (न मोजता येणाऱ्या) घटकांमध्ये तेथील निर्माण होणारा भावनिक जिव्हाळा, या रस्त्याची ओळख, तेथील आठवणी व अनुभव यातून उलगडून दाखवता आल्या. या अभ्यासामुळे जंगली महाराज रस्त्याचे पुणेकरांशी असणारे सामाजिक व भावनिक नाते अधिक सखोलपणे समजण्यास मदत झाली असून शहरातील ऐतिहासिक अन्य रस्तेही लोकजीवनाशी कसे घट्ट जोडलेले असू शकतात याचा नविन दृष्टिकोन मिळू शकला.
यासंबंधी बोलताना बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले की, जंगली महाराज रस्ता हा पुणे महापालिकेने बांधलेला एक आदर्श रस्ता असून 1955 मध्ये मुंबईतील एका रस्ते बांधणी कंपनीला त्याचे कंत्राट दिले होते. या रस्त्याला 70 वर्षे पूर्ण झाली असली तरी तो अजूनही भक्कमपणे सेवा देत आहे. हे लक्षात घेऊन तसेच या रस्त्यावरील गेल्या सात दशकांमधील सामाजिक व सांस्कृतिक बदल पाहता या रस्त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने हा अभ्यास करण्याचे आम्ही ठरवले.
डॉ. स्वाती सहस्रबुद्धे म्हणाल्या की, हा आमच्या व पीव्हीपी कॉलेजच्या 18 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भूशास्त्रकला आणि शहर रचना या विषयांमधील नऊ सिद्धान्तांचा संयुक्तपणे वापर कसा होतो आहे, यासंबंधी हा अभ्यास केला. हे नऊ सिद्धान्त शहर उभारणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी आम्ही एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यानुसार निवडण्यात आलेल्या जंगली महाराज रोडच्या अभ्यासात आपली निरीक्षणे नोंदवत तीन गटांमध्ये काम करणाऱ्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यावर दहा मिनिटांची तीन दृकश्राव्य चित्रफितीही तयार केल्या.
या कार्यशाळेच्या आयोजक प्रा. मुक्ता गोखले -कुलकर्णी म्हणाल्या की, एकाच वेळी सैद्धान्तिक अभ्यास व जंगली महाराज रोडवर जाऊन त्याची प्रत्यक्ष पडताळणी करणे या हेतूनेच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये आर्किटेक्चरच्या पदवीपूर्व तसेच पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग होता. या नऊ सिद्धान्तांनुसार शहर उभारणीत बांधकाम, रस्ते यामधील अवकाश आणि आजवर झालेले बांधकाम यातील नाते, तेथील जागेसंबंधीचा गुणधर्म आणि नागरिक म्हणून तेथील मानवी वर्तन कसे असते याचा अभ्यास करण्यात आला.
