
पुणे : देशातील पहिल्या व्यावसायिक बास्केटबॉल लीग, तसेच या खेळाला पोषक वातावरण उभारण्यास चालना देण्यासाठी एसीजी स्पोर्ट्सने एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बास्केटबॉल लीगचे १४ ते २१ मार्चदरम्यान पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर आयोजन केले आहे. या स्पर्धेत आठ मुलांच्या आणि पाच मुलींच्या संघांचा सहभाग असणार असून, युवक खेळाडूंना व्यावसायिक, प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण स्पर्धात्मक अनुभव देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
अशी माहिती एसीजी स्पोर्ट्सचे स्ट्रॅटेजिक हेड राहुल झा आणि एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीगचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विमाननगर येथील फोर पॉइंट्स शेरेटोन हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेवेळी केरळ बास्केटबॉल संघटनेचे सचिव पी. सी. अँटोनी, तेलंगणा बास्केटबॉल संघटनेचे सचिव पृथ्वी रेड्डी आणि दिल्ली बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष मुकेश कालिया उपस्थित होते.
अनिरुद्ध पोळे म्हणाले, “एसीजी स्पोर्ट्स व एबीसी बास्केटबॉल डेव्हलपमेंट लीग यांच्या या संयुक्त उपक्रमाचा उद्देश राज्य व देशपातळीवर बास्केटबॉलसाठी दीर्घकालीन विकासात्मक मार्ग तयार करणे आहे. यामुळे तळागाळातील खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये महाराष्ट्र, केरळ, दिल्ली आणि तेलंगणामध्ये १४ व १८ वर्षांखालील गटांसाठी सात लीग आयोजित केल्या जाणार आहेत. पुढच्या टप्प्यात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश व हरियाणा-चंदीगड येथेही बास्केटबॉल लीग भरविण्यात येणार आहेत.”
राहुल झा म्हणाले, “भारतीय बास्केटबॉलच्या भविष्यासाठी खेळाडूंच्या विकासाचा संपूर्ण मार्ग उभारणे आवश्यक आहे. युवकांसाठी लीग आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षण व्यवस्थेतील समन्वयामुळे खेळाडूंना चांगल्या संधी मिळतील. या लीग फ्रँचायझी-आधारित असून, रचनात्मक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून उदयोन्मुख खेळाडूंची ओळख व त्यांचा विकास साधला जाणार आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना एसीजीच्या ‘हाय परफॉर्मन्स सेंटर्स’मध्ये चाचण्यांची संधीही दिली जाणार आहे.”
प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी आणि रणविजय सिंग हे या लीगसाठी ब्रँड अँबेसेडर असणार आहेत. केरळ बास्केटबॉल लीगची सुरुवात आधीच झाली असून, दिल्ली आणि तेलंगणामधील लीग पुढील टप्प्यात राबविण्यात येणार आहेत. एसीजी स्पोर्ट्स ही एसीजी फार्मास्युटिकल समूहाची क्रीडा व्यवस्थापन शाखा असून, बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने देशातील व्यावसायिक बास्केटबॉल आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कार्यरत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
विविध राज्यांच्या बास्केटबॉल संघटनांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुथू कुमार यांनी महाराष्ट्रातील समृद्ध बास्केटबॉल संस्कृतीला अशा रचनात्मक उपक्रमांमुळे बळ मिळेल, असे सांगितले. पीसी अँटोनी, पृथ्वी रेड्डी व मुकेश कालिया यांनीही बास्केटबॉलमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
